Share this...

सोलापूर भेटीनंतर तातडीची कार्यवाही

मुंबई दिनांक 04 एप्रिल, 2025 (प्रतिनिधी / वार्ताहर) –

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक 08 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता विधान भवन, मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 31 मार्च, 2025 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विद्यापीठास प्रत्यक्ष भेट देऊन विद्यापीठ विकासासंदर्भात विविध विषयांवर कुलगुरु प्रा.डॉ.प्रकाश महानवर यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी येत्या 15 दिवसात यासंदर्भात मुंबईत बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत त्यांनी आश्वासीत केले होते, त्यानुसार ही बैठक 15 दिवसांच्या आत आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरु, संबंधीत खात्यांचे मंत्री, सचिव तसेच जिल्हाधिकारी, सोलापूर हे या बैठकीस उपस्थित राहणार असून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने या बैठकीकडे सोलापूर जिल्हावासिय तसेच विद्यार्थी – पालकांचे लक्ष वेधले गेले आहे.

दिनांक 31 मार्च, 2025 रोजीच्या सोलापूर दौऱ्यात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, विस्तारीत प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. विद्यापीठाने संपादित केलेल्या जमिनीवर माळढोक पक्षी अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि राखीव वनक्षेत्र असे विविध आरक्षण आहे. विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. या आणि अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंगळवार, दिनांक 08 एप्रिल, 2025 रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मा.वन मंत्री, मा.महसूल मंत्री, मा.कुलगुरु आणि मा.जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
…….

प्रति,
मा. संपादक/वृत्तसंपादक

कृपया उपरोक्त बातमीस आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक/प्रिंट माध्यमाद्वारे ठळक प्रसिध्दी देण्यात यावी, हि विनंती.

आपला,

(निलेश मदाने)
मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे जनसंपर्क अधिकारी

Share this...