वैभवशाली इतिहास शिकवल्यास परिवर्तन घडेल : डॉ. कोकाटे ५ व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा समारोप
सोलापूर : सामाजिक साहित्यिक भान सर्वांनी जपले पाहिजे. साहित्यातून समाज जागृती होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर व होळकर परिवाराचा इतिहास शौर्य व धैर्याचा आहे मात्र पाठ्यपुस्तकातून खरा इतिहास शिकवला जात नाही. वैभवशाली इतिहास शिकवल्यास निश्चित परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
बेलाटी येथे शनिवारी, २४ ते २५ फेब्रुवारी दरम्यान श्री संत सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट, बेलाटी आयोजित पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी विचारमंचावर संमेलनाचे अध्यक्ष माजी आ. एड. रामहरी रुपनवर , संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, नगर प्रशासन सह आयुक्त रामदास कोकरे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर, कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील, उपाध्यक्ष संभाजी सुळ, सिद्धारूढ बेडगनुर, उज्ज्वलकुमार माने, बिसलसिद्ध काळे, प्रा. देवेंद्र मदने, कुंडलिक आलदर, सांगलीचे विक्रम दानगे, प्रा. शिवाजी बंडगर, अण्णाप्पा सतुबर, अमोल पांढरे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सिद्धारूढ बेडगनुर यांनी ठरावाचे वाचन केले. त्यास हात उंचावून येळकोट येळकोट जय मल्हार, बाळू मामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत प्रतिसाद देण्यात आला. सूत्रसंचालन सदाशिव व्हनमाने यांनी केले. ओंकार बेडगनुर व बिसलसिद्ध काळे यांनी आभार मानले.
डॉ. कोकाटे पुढे म्हणाले, समाजाचे भवितव्य हे आमदार, खासदार लोकप्रतिनिधी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच साहित्यिक, लेखक, कवी पाहिजे. साहित्यिक कवी हे जपले पाहिजेत. आजही आरक्षणासाठी लढा द्यावा लागतो. सामाजिक व साहित्यिक भान जपले पाहिजे. प्राचीन काळात ढाल तलवारीची लढाई होती. आता यापुढे शिक्षण घेऊन बुद्धीने लढा द्यावा लागेल. मराठ्यांचा इतिहास १८ पगड जाती आणि बारा बलुतेदारासह रयतेचा आहे. अहिल्यादेवी यांचा शौर्य व औदार्याचा इतिहास आहे. जे लढले नाहीत, पराक्रम केला नाही, तो इतिहास शिकवला जातो. धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. शिक्षणाची गरज आहे. वैभवशाली इतिहास पाठ्यपुस्तक पुस्तकातून शिकवल्यास परिवर्तन घडेल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसे जोडली. राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाचा पाया रचला. सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय समता येत नाही, तोपर्यंत आरक्षण गरजेचे आहे. इतिहास समाज जोडण्याचे काम करतो. साहित्यातून समाज जागृती होते. त्यामुळे साहित्यिकांना जपले पाहिजे, असे आवाहन यावेळी डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
चेतन नरोटे म्हणाले, साहित्य संमेलनातून विचारांची देवाण-घेवाण होते. विचार संमेलनातून पुढे येतात. त्यांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत. परिवर्तन घडेल. विविध समाजांना आरक्षणाच्या आश्वासन देऊन सामाजिक तेढ निर्माण केले जात आहे. त्यामुळे आहे तेच आरक्षण टिकवणे आता आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. टकले म्हणाले, संमेलनातून महापुरुषांचे विचार, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशातून हे पाचवे संमेलन येथे आयोजित केले. यापुढेही अखंडितपणे संमेलन होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर म्हणाले, धनगर समाज हा शूर लढवय्ये समाज आहे. वैभवशाली इतिहास आहे. मूळ मानव जातीची उत्पत्ती धनगरापासून झाली आहे. आंतरजातीय विवाह गरजेचे आहेत, असे सांगतानाच धनगर समाजाच्या इतिहासाचे विविध दाखले त्यांनी यावेळी दिले.
या संमेलनात विविध आठ ठराव करण्यात आले. त्यास हात उंचावून मंजूरी देण्यात आली. यामध्ये धनगर समाजाच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी २ हजार कोटी पर्यंत निधी देण्यात यावा. धनगर मेंढ्यापालासाठी संरक्षण व हक्क कायदा करावा. संत बाळूमामा विचाराचे अध्यापन छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरु करावे. धनगर समाजाला आदिवासीच्या सर्व सवलती लागू कराव्यात. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र संस्थेची निर्मिती करावी. धनगर समाजाला लागु असलेली क्रिमिलअरची अट रद्द करावी. आदिवासी धनगर साहित्य संमलेन आणि धनगर धर्मपीठ यांना शासकिय निधी मिळावा आदी ठराव संमत करण्यात आले